

गोंदिया(अनिल मुनीश्वर):-
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, देवरी येथे प्रकल्प अधिकारी म्हणून दिनांक 14 फेब्रुवारी 2024 ते 30 जून 2026 या कालावधीत कार्यरत असलेले मा. उमेश काशिद यांनी आपल्या कार्यकाळात लोकाभिमुख प्रशासन, संवेदनशील निर्णयक्षमता आणि विकासाभिमुख नियोजनाच्या माध्यमातून प्रकल्पाला नवी दिशा दिली. शिक्षण, क्रीडा, आरोग्य, रोजगार, पायाभूत सुविधा आणि आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची राज्यस्तरावरही दखल घेण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी राबविण्यात आलेल्या ‘मिशन शिखर’ उपक्रमातून NEET, JEE आणि MHT-CET परीक्षांसाठी विशेष मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमामुळे सुमारे 100 विद्यार्थ्यांना विविध उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळाला. यातील काही विद्यार्थ्यांना लॅपटॉप चे वाटप सुद्धा करण्यात आले. ‘मिशन शिष्यवृत्ती’ अंतर्गत इयत्ता 5 वी व 8 वी मधील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची जाणीव व कौशल्य प्राप्त करून देण्यात आले.
क्रीडा क्षेत्रात ‘मिशन ऍथलेटिक्स’ अंतर्गत एका विद्यार्थिनीची खेलो इंडियासाठी निवड झाली, विभागीय स्पर्धेत सलग दोन वेळा उपविजेतेपद मिळाले, तर प्रथमच 22 विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय स्पर्धेत स्थान मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली.
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षक प्रशिक्षण, बोलक्या भिंती, नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम, तसेच सर्व आश्रमशाळांमध्ये रंगरंगोटी करून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी वातावरण उपलब्ध करून देण्यात आले. उन्हाळी सराव शिबिरांमुळे विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा, सर्जनशीलता आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळाली.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गोंदिया वसतिगृहाच्या जागेचा प्रश्न सोडविण्यात यश आले. हिरापूर येथील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटवून जमीन अतिक्रमणमुक्त करण्यात आली. आश्रमशाळांतील शिक्षण, निवास, भोजन व शिष्यवृत्ती सुविधांमध्येही लक्षणीय सुधारणा करण्यात आली.
दुर्गम आदिवासी पाड्यांवर प्रत्यक्ष भेटी देऊन नागरिकांच्या समस्या जाणून त्यांचे तात्काळ निराकरण करण्यात आले. शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पारदर्शक व वेळेत पोहोचविण्यावर विशेष भर देण्यात आला. प्रलंबित वनहक्क प्रकरणे मार्गी लावून अनेक कुटुंबांना न्याय मिळवून देण्यात आला.
महिला बचत गट व युवकांसाठी बांबू हस्तकला केंद्राच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीला चालना देण्यात आली. फिरत्या इलेक्ट्रिक जनजागृती वाहनाद्वारे स्वच्छता, आरोग्य आणि विविध शासकीय योजनांची माहिती दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली. तसेच विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन करून दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. नागलडोह येथील नैसर्गिक आपत्तीग्रस्त पात्र कुटुंबांना प्रत्येकी ₹50 हजारांची आर्थिक मदत मिळवून देत संवेदनशील प्रशासनाची प्रचिती दिली.
अल्पावधीतच शिक्षण, क्रीडा, पायाभूत सुविधा, आदिवासी कल्याण, रोजगार आणि लोककेंद्रित प्रशासनाच्या माध्यमातून देवरी प्रकल्पाची वेगळी ओळख निर्माण करण्यात मा. उमेश काशिद यशस्वी ठरले असून त्यांच्या कार्याचा ठसा आदिवासी विकासाच्या वाटचालीत कायम स्मरणात राहील.










