गोंदिया (अनिल मुनीश्वर):-
यावर्षीची सर्वात मोठी, ऐतिहासिक आणि उल्लेखनीय बाब म्हणजे गोंदिया जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच समग्र शिक्षाअंतर्गत जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी डेस्क-बेंच व इतर आवश्यक फर्निचर उपलब्ध करून देण्यासाठी तब्बल ₹४.०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
जिल्हा परिषद पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, शिक्षक, पालक तसेच ग्रामीण भागातील नागरिकांकडून जिल्हा परिषद शाळांमध्ये डेस्क-बेंचची तीव्र कमतरता असल्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने मांडला जात होता. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभांमध्ये, विविध बैठका, ग्रामीण दौरे व जनसंपर्क कार्यक्रमांदरम्यान पदाधिकारी व सदस्यांनी आमदार श्री. विनोद अग्रवाल यांच्याकडे विद्यार्थ्यांना सन्मानाने बसून शिक्षण घेता यावे यासाठी शाळांना आवश्यक फर्निचर उपलब्ध करून देण्याची मागणी वारंवार लावून धरली. शासन स्तरावर या विषयासाठी विशेष पाठपुरावा करण्याची विनंतीही त्यांनी सातत्याने केली.
जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्यांची ही सामूहिक मागणी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन आमदार श्री. विनोद अग्रवाल यांनी हा विषय केवळ फर्निचरपुरता मर्यादित न ठेवता ग्रामीण विद्यार्थ्यांचा सन्मान, दर्जेदार शिक्षण आणि समान शैक्षणिक संधी यांच्याशी निगडित असल्याचे शासनाच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनी हा प्रस्ताव मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसमोर प्रभावीपणे मांडत गोंदिया जिल्ह्यासाठी विशेष निधीची मागणी केली. शासनाने या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि आमदारांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळत गोंदिया जिल्ह्यासाठी प्रथमच ₹४.०० कोटींचा स्वतंत्र फर्निचर निधी मंजूर करण्यात आला.
जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थी वर्षानुवर्षे डेस्क-बेंचच्या अभावामुळे जमिनीवर किंवा अत्यंत गैरसोयीच्या परिस्थितीत शिक्षण घेत होते. आता या निधीतून हजारो विद्यार्थ्यांना आधुनिक डेस्क-बेंच उपलब्ध होणार असून त्यांना सन्मानाने बसून शिक्षण घेण्याची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे शाळांमधील शैक्षणिक वातावरण अधिक सुसज्ज, दर्जेदार आणि प्रेरणादायी होणार आहे.
ही मंजुरी केवळ ₹४ कोटींच्या निधीपुरती मर्यादित नसून, जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्यांची सातत्यपूर्ण मागणी, ग्रामीण जनतेच्या अपेक्षा, आमदार श्री. विनोद अग्रवाल यांचे प्रभावी नेतृत्व आणि शासनाच्या सकारात्मक सहकार्याचे हे यशस्वी फलित आहे. यामुळे गोंदिया जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना थेट लाभ मिळणार असून सरकारी शाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यास मोठी मदत होणार आहे.
याच मंजुरीमध्ये १६ जिल्हा परिषद शाळांमध्ये ३४ नवीन वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी ₹५.२७ कोटी तसेच १६ जिल्हा परिषद शाळांमधील प्रमुख दुरुस्तीच्या कामांसाठी ₹२.०० कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक शाळांतील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या पायाभूत सुविधांच्या समस्या मार्गी लागणार असून विद्यार्थ्यांना अधिक सुरक्षित व दर्जेदार शैक्षणिक वातावरण उपलब्ध होणार आहे.
विशेष म्हणजे, समग्र शिक्षाअंतर्गत सन २०२५-२६ मध्ये गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांसाठी ना नवीन वर्गखोल्यांना मंजुरी मिळाली होती, ना प्रमुख दुरुस्तीच्या कामांना. अशा परिस्थितीत आमदार श्री. विनोद अग्रवाल यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अवघ्या एका वर्षात ३४ नवीन वर्गखोल्या, १६ शाळांमधील प्रमुख दुरुस्तीची कामे आणि प्रथमच विद्यार्थ्यांच्या फर्निचरसाठी ₹४ कोटींचा निधी मंजूर होणे, ही गोंदिया जिल्ह्याच्या शैक्षणिक इतिहासातील अत्यंत महत्त्वाची आणि अभिमानास्पद उपलब्धी मानली जात आहे.









