ध्वनी प्रदूषणाविरोधात गोंदिया पोलिसांची कारवाई; डीजे चालक-मालकांवर गुन्हे दाखल
गोंदिया(अनिल मुनीश्वर):
दि. २३ सप्टेंबर : ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी गोंदिया पोलिसांनी डीजे साऊंड चालक व मालकांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलीस अधीक्षक गौरव भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत गोंदिया शहर व रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत डीजेच्या वाढीव आवाजामुळे ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गोंदिया शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चावडी चौकातील छोटा गोंदिया येथील सार्वजनिक ठिकाणी डीजे साऊंडच्या माध्यमातून मोठ्या क्षमतेचे ध्वनिक्षेपण करणाऱ्या डी.जे. मालक नंदिकेश्वर बुधराम राजू (वय ३८) याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. डीजेच्या साहाय्याने मोठ्या आवाजात संगीत वाजवून आवाजाची मर्यादा ओलांडल्याने महाराष्ट्र पोलीस अधिनियम तसेच ध्वनी प्रदूषण (विनियमन व नियंत्रण) अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
त्याचप्रमाणे रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टी.बी. टोली, गोंदिया येथे सार्वजनिक ठिकाणी डीजेचा वापर करणारे चालक व मालक राकेश भाऊराव गजभिये (वय ४९), अंकित महेंद्र नागोसे (वय २०) आणि हिरेश नंदलाल धारिपेंडे यांच्याविरुद्धही ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधितांविरुद्ध ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) अधिनियम २००० तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील संबंधित कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे.
गणेश मंडळे व डीजे चालकांना पोलिसांचे आवाहन
सार्वजनिक ठिकाणी ध्वनी प्रदूषण होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने सर्व गणेश मंडळे तसेच डीजे चालक व मालकांना केले आहे. पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, जेणेकरून सामान्य जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक गौरव भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशचंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गोंदिया शहर व रामनगर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
— AGMNEWS24, गोंदिया
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा
मोबाईल-9420873630








