प्रदेशाध्यक्ष शैलेंद्र भदाणे यांना गोंदिया वनविभागाचा भावपूर्ण निरोप
वनरक्षक-वनपाल संघटनेच्या वतीने शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार
सडक अर्जुनी (अनिल मुनीश्वर):
महाराष्ट्र वनरक्षक वनपाल संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शैलेंद्र भदाणे यांची गोंदिया वनविभागातून धुळे सर्कल येथे बदली झाल्याने महाराष्ट्र वनरक्षक वनपाल संघटना, नागपूर शाखा गोंदियाच्या वतीने कोहमारा येथे त्यांचा सत्कार व निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन त्यांच्या गोंदिया वनविभागातील उल्लेखनीय योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
शैलेंद्र भदाणे यांचा वनविभागातील सेवाप्रवास सन २००७ मध्ये गोंदिया येथून सुरू झाला. सेवाकाळात त्यांनी महाराष्ट्र वनरक्षक वनपाल संघटनेच्या माध्यमातून प्राथमिक सदस्य म्हणून संघटनात्मक कार्याला सुरुवात केली. त्यानंतर गोंदिया जिल्हाध्यक्ष, नागपूर कार्याध्यक्ष, प्रदेश कोषाध्यक्ष, प्रदेश महासचिव आणि अखेर प्रदेशाध्यक्ष अशी विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या.
गोंदिया वनविभागात कार्यरत असताना त्यांनी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली. कर्मचारी-अधिकाऱ्यांवर अन्याय झाल्यास, सेवेशी संबंधित अडचणी निर्माण झाल्यास किंवा कोणतीही समस्या उद्भवल्यास ती सोडविण्यासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळातील योगदानाबद्दल कर्मचारी वर्गात विशेष आपुलकी निर्माण झाली.
सत्काराला उत्तर देताना शैलेंद्र भदाणे म्हणाले, “माझी गोंदिया वनविभागातून बदली होत असून मी माझ्या मूळ जिल्ह्याकडे जात आहे. मात्र मनाने, आठवणीने आणि नात्यांनी गोंदिया माझ्यापासून कधीही दूर जाणार नाही.” महाराष्ट्र वनरक्षक वनपाल संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी मिळणे ही अभिमानाची बाब असून, गोंदिया येथील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी दिलेले सहकार्य कायम स्मरणात राहील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
भदाणे यांच्या बदलीनंतर ठिकाण बदलले असले तरी गोंदिया वनविभागातील त्यांच्या कार्याची, सहकाऱ्यांसाठी घेतलेल्या भूमिकेची आणि दिलेल्या योगदानाची आठवण कायम राहील, अशा भावना उपस्थित वन कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या.
या निरोप समारंभाला गोंदिया वनविभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








