लोकसहभागातून आपत्ती व्यवस्थापन प्रभावी करणे गरजेचे
— जि.प. अध्यक्ष लायकराम भेंडारकर
गोंदिया(अनिल मुनीश्वर):

नैसर्गिक अथवा मानवनिर्मित आपत्ती सांगून येत नाही. आपत्तीच्या प्रसंगी जीवित व वित्तीय हानी कमी करण्यासाठी नागरिकांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. लोकसहभाग आणि जनजागृतीच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी करणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी केले.
लोकसंवाद अभियानाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि रोजगाराच्या संधींची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत गोंदिया शहरातील सिव्हील लाईन परिसरातील अपना गणेशोत्सव मंडळाच्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन विषयक प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भेंडारकर बोलत होते.
कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अपना गणेशोत्सव मंडळाचे संचालक पंकज रहांगडाले, निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे आणि जीडीसीसी बँकेचे संचालक दुर्गाप्रसाद ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आपत्तीच्या काळात नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. तसेच आपत्तीपूर्व तयारी, सुरक्षिततेच्या उपाययोजना आणि बचावकार्याबाबत प्रत्येकाने प्राथमिक माहिती घेणे आवश्यक आहे, असे भेंडारकर यांनी सांगितले. अलीकडील नेपाळमधील महापुराच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर बचावकार्याची पूर्वतयारी आणि नागरिकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रात्यक्षिकांमुळे नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत स्वतःच्या तसेच इतरांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती मिळण्यास मदत होत असल्याचे सांगितले. निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे यांनी प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि नागरिक यांच्यातील समन्वयाचे महत्त्व स्पष्ट केले.
टाकाऊ वस्तूंपासून ‘फ्लोटींग डिव्हाईस’ची निर्मिती
यावेळी घरगुती तसेच टाकाऊ वस्तूंचा वापर करून शोध व बचाव कार्यासाठी आवश्यक ‘फ्लोटींग डिव्हाईस’ तयार करून त्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. पूरपरिस्थितीत उपलब्ध साधनसामग्रीचा सुरक्षित पद्धतीने वापर करून बचावकार्य कसे करता येते, याबाबत उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी केले. अपना गणेश मंडळाचे अध्यक्ष अमित अवस्थी, सदस्य अरविंद तिवारी, निलेश गुप्ता, अजित टेंभरे, विवेक रहांगडाले, दीपक मालगुजर, मोहन लिल्हारे यांच्यासह विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









