
गोंदिया(अनिल मुनिश्वर):——————————————————- जिल्हा परिषद गोंदिया यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत सडक अर्जुनी तालुक्यातील स्मार्ट ग्रामपंचायत कोकणा जमी.येथे ग्रामविकासाला चालना देण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते संदीप पाठक यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांच्या आगमनावेळी ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत करत पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. महिलांनी लेझीमच्या तालावर आकर्षक नृत्य सादर केले तर ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी करून कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण केले.
सध्या विदर्भ दौऱ्यावर असलेल्या अभिनेते संदीप पाठक यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत मराठी कलाकार राज्यातील विविध जिल्ह्यांतील गावांना भेट देत आहेत. गावोगावी जाऊन ग्रामस्थांमध्ये जनजागृती करणे, त्यांना प्रोत्साहन देणे, गावाच्या विकासासाठी प्रेरणा देणे आणि मार्गदर्शन करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गाव या अभियानात सहभागी होत असून गावाच्या विकासासाठी सर्वजण एकत्र येत असल्याचे पाहून आनंद वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. कोकणा जमी. येथे आल्यानंतर राष्ट्रसंत तुकोडोजी महाराज यांनी काही वर्षे या गावात वास्तव केले होते, ही माहिती मिळाल्याने अशा पवित्र भूमीत येण्याची संधी मिळाल्याचा आनंद असल्याचेही त्यांनी व्यक्त केले.
सडक अर्जुनी पंचायत समितीचे खंड विकास अधिकारी दिलीप खोटेले यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री पंचायतराज अभियानांतर्गत राज्यातील ग्रामपंचायतींमार्फत विविध विकासात्मक उपक्रम राबविले जात आहेत. सडक अर्जुनी तालुक्यातून कोकणा जमी.सह आणखी सहा ग्रामपंचायती या अभियानात सहभागी झाल्या आहेत. पंचायत राज अभियानातील विविध निकष पूर्ण करून ग्रामविकासात ठसा उमटविण्याचे काम या ग्रामपंचायतींमार्फत केले जात आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अभिनेते संदीप पाठक यांनी कोकणा जमी येथे भेट देऊन ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.
पंचायत समिती सडक अर्जुनीचे सभापती चेतन वडगाये यांनी सांगितले की, पंचायत समिती अंतर्गत कोकणा जमी. ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री पंचायतराज अभियानात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला आहे. सदिच्छा भेट म्हणून अभिनेते संदीप पाठक यांनी येथे भेट दिली असून ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गावाला तालुक्यातून प्रथम पारितोषिक मिळावे, अशी भावना नागरिकांच्या मनात असून त्यामुळेच गावकऱ्यांनी स्वेच्छेने लोकवर्गणी गोळा करून या अभियानात सक्रिय सहभाग नोंदविला आहे. कोकणा जमी. ग्रामपंचायत तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ग्रामपंचायत अधिकारी धर्मराज लंजे यांनी माहिती देताना सांगितले की, 17 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हास्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये चार ग्रामपंचायतींचा समावेश होता, त्यापैकी सडक अर्जुनी तालुक्यातील कोकणा जमी ग्रामपंचायत होती. ग्रामस्थ, पदाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. मुख्यमंत्री पंचायतराज अभियानातील स्पर्धेत तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळाल्यास 15 लाख रुपये, दुसऱ्या क्रमांकासाठी 12 लाख रुपये आणि तिसऱ्या क्रमांकासाठी 9 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच विशेष पुरस्कारासाठी 5 लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. कोकणा जमी ग्रामपंचायतीची तयारी पाहता प्रथम क्रमांक मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सरपंच अमरदीप रोकडे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हा ग्रामविकासासाठी अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे. गावाचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी या अभियानातून मोठी प्रेरणा मिळत आहे. या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये विकासाबाबत जागरूकता निर्माण झाली आहे. अभिनेते संदीप पाठक यांच्या भेटीमुळे गावकऱ्यांमध्ये आणखी उत्साह व ऊर्जा निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान अभिनेते संदीप पाठक यांनी गावातील गुरुदेव सेवा मंडळाच्या मंदिराला भेट देऊन तेथील प्रतिमांना पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर मंदिरापासून ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. कार्यक्रमात जिल्हा परिषद गोंदियाचे पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वासनिक, खंडविकास अधिकारी दिलीप खोटेले यांनीही उपस्थिती लावली.
यावेळी पंचायत समिती सभापती चेतन वडगाये, उपसभापती निशाताई काशीवार, पंचायत समिती सदस्य शिवाजी गहाणे,सरपंच अमरदीप रोकडे, ग्रामपंचायत अधिकारी धर्मराज लंजे, माजी सरपंच खेमराज भंडारकर माजी सभापती शीला भंडारकर,गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष परमानंद तिमाजी कोरे,ईश्वर कोरे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान 100 टक्के घरकर व पाणीकर वसुली केल्याबद्दल ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच तसेच ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
दरम्यान कार्यक्रमाच्या मंडपात स्थानिक शेतकऱ्यांनी पिकवलेली फळे व भाज्या विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पाहुण्यांनी या उपक्रमाचे निरीक्षण करून शेतकऱ्यांचे कौतुक केले. गावा लगत नारळाच्या झाडांचे वृक्षारोपण आलेल्या पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले, संपूर्ण कार्यक्रमात ग्रामस्थांचा उत्साह आणि सहभाग उल्लेखनीय दिसून आला.









