
सडक अर्जुनी(अनिल मुनीश्वर):—————-
तालुक्यातील फुटाळा येथे तलावात बुडून सागर आनिक गहाणे व प्रणय गोवर्धन गहाणे या दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार राजकुमार बडोले यांनी फुटाळा येथे जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले. या अत्यंत दुःखद प्रसंगी त्यांनी कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत त्यांना धीर दिला.
यावेळी आमदार बडोले यांनी दिवंगत आत्म्यांना श्रद्धांजली अर्पण करत कुटुंबियांच्या पाठीशी शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत उभी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे सांगीतले. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबतही संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
मतदारसंघातील आरोग्य सुविधांचा सखोल आढावा घेण्यासाठी मंगळवारी मुंबई येथील मंत्रालयात आरोग्य विभागाची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहितीही आमदार बडोले यांनी दिली. नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील तसेच या संदर्भातील प्रश्न अधिवेशनातही उपस्थित करून शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी जि.प. अध्यक्ष लायकराम भेंडारकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले, पंचायत समिती सभापती चेतन वडगाये, जि.प. सदस्य कविता रंगारी, कृ.उ.बा.स. सभापती अविनाश काशिवार, उपविभागीय अधिकारी ज्योती कांबळे, तहसीलदार प्रेरणा कटरे, पं.स. सदस्य वर्षा शहारे, फुटाळा सरपंच लता गहाणे, दीपक गहाणे, सचिन गहाणे, आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.









