३१ जानेवारीपर्यंत धान विकलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच रक्कम जमा होणार; उर्वरित थकबाकीसाठीही प्रयत्न सुरू
गोंदिया(अनिल मुनीश्वर):——————— गोंदिया जिल्ह्याचे आमदार विनोद अग्रवाल हे सातत्याने शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित मुद्दे विधानसभेत मांडत आले आहेत. जनहित तसेच विशेषतः शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत सक्रिय राहणारे आमदार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. धान उत्पादक जिल्हा म्हणून गोंदिया येथील शेतकऱ्यांना धानाचे चुकारे वेळेवर मिळावेत, यासाठी त्यांनी विधानसभेत सरकारचे लक्ष वेधले होते.
आमदार विनोद अग्रवाल यांनी हा मुद्दा गांभीर्याने घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या थकीत देयकांच्या तातडीने भुगतानाची मागणी केली होती. तसेच राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबल यांच्याशीही चर्चा करून धान उत्पादक शेतकऱ्यांना लवकरात लवकर पैसे देण्याची मागणी केली होती. या प्रयत्नांचे फलित म्हणून राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या थकीत देयकांच्या भुगतानासाठी ₹२०८ कोटी ८८ लाखांची निधी मंजूर केली आहे. या निधीमधून सुमारे २५ लाख १५ हजार क्विंटल धानाचे चुकारे शेतकऱ्यांना अदा करण्यात येणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार ३१ जानेवारीपर्यंत धान विक्री केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच रक्कम जमा करण्यात येणार आहे. तसेच सुमारे ५० हजार क्विंटल धानाचे चुकारे अद्याप प्रलंबित आहेत, तेही ३१ मार्चपर्यंत शेतकऱ्यांना मिळावेत यासाठी आमदार विनोद अग्रवाल प्रयत्नशील आहेत.याशिवाय शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी धान खरेदीची मर्यादा (लिमिट) वाढविण्याची मागणीही आमदार विनोद अग्रवाल सातत्याने करत आहेत.
शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेल्या या प्रयत्नांमुळे आमदार विनोद अग्रवाल सध्या चर्चेत असून शेतकऱ्यांमध्ये लवकरच सर्व थकीत देयके मिळतील, अशी अपेक्षा निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या या निर्णयाबद्दल आमदार विनोद अग्रवाल यांनी राज्य सरकारचे आभार मानले असून प्रलंबित मागण्याही शेतकऱ्यांच्या हितासाठी लवकर पूर्ण करण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच शेतकऱ्यांनीही या प्रयत्नांसाठी आमदार अग्रवाल यांचे आभार मानले आहेत.









