गोंदिया(अनिल मुनीश्वर) :—————————————————– जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील बोपाबोडी येथे वन विभागाच्या जमिनीची मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. शेकडो गावकऱ्यांनी घटनास्थळी जमून मोजणीला विरोध दर्शविल्याने अखेर भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांना आल्या पावली माघारी फिरावे लागले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक देवेंद्र समृत्वार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सडक अर्जुनी येथील वन परीक्षेत्र अधिकारी मिथुन तरोने यांनी मौजा बोपाबोडी जवळील वन विभागाच्या जागेची मोजणी करून त्याची हद्द निश्चित करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्र देत पाठविले. या ठिकाणी एकूण सहा वेगवेगळ्या गटांची मोजणी करण्यात येणार होती. मात्र मोजणीसाठी अधिकारी पोहोचताच बोपाबोडी गावातील नागरिकांनी तीव्र विरोध नोंदविला. दरम्यान, काही वेळाने वन विभागाचे वन परीक्षेत्र अधिकारी मिथुन तरोने घटनास्थळी दाखल झाले. त्या पूर्वी वन विभागाचे बिट गार्ड, वनपाल, पोलीस विभागाचे कर्मचारी तसेच महसूल विभागाचे तलाठी आणि मंडळ अधिकारीही उपस्थित होते. तरीदेखील ग्रामस्थांनी मोजणीला विरोध कायम ठेवला.
माहितीनुसार, २०१२ मध्ये श्रीरामनगर गावाचे पुनर्वसन ग्राम सौंदड परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ लगत करण्यात आले होते. त्यावेळी सौंदड व बोपाबोडी येथील वन विभागातील तब्बल १२ गट श्रीरामनगर येथील नागरिकांना शेतीसाठी देण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र बोपाबोडी गावातील नागरिकांचे म्हणणे आहे की शासनाने कार्यालयात बसूनच हे गट श्रीरामनगर गावाला दिले असून त्यात स्थानिक ग्रामस्थांच्या हक्काच्या जमिनींचाही समावेश करण्यात आला आहे.
ग्रामस्थांच्या मते, बोपाबोडी गावाची हद्द वनजमिनीपर्यंत मर्यादित ठेवून त्यापुढील जमीन श्रीरामनगर गावाला देण्यात यावी. अन्यथा संपूर्ण गाव आंदोलनाचा मार्ग अवलंबेल, असा इशारा गावकऱ्यांच्या वतीने सरपंच निखिल मेश्राम आणि उपसरपंच गणेश कापगते यांनी दिला आहे. गावकऱ्यांचे म्हणणे आहे की गावालगतची संपूर्ण जमीन श्रीरामनगर गावाला दिल्यास बोपाबोडी गावातील नागरिकांचे अस्तित्वच धोक्यात येईल. अनेकांची घरे, शेती आणि जमीन या गटांमध्ये येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. तसेच शेतकऱ्यांना जनावरे चारण्यासाठी जागा उरणार नाही, चुलीसाठी जंगलातून लाकूड आणण्याची सोयही बंद होईल. गावातील स्मशानभूमी आणि गोवारी स्मारक देखील याच गटात येत असल्याचे सांगत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, या प्रकरणाबाबत स्थानिक आमदारांच्या माध्यमातून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा झाल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे पुढे या वादावर काय तोडगा निघतो, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
वन विभागाचे अधिकारी मिथुन तरोने यांनी सांगितले की, वन विभागाच्या गटांची मोजणी करून जागेची सीमा निश्चित करणे एवढेच काम सुरू होते, मात्र तरीही ग्रामस्थांनी विरोध कायम ठेवला.
या घटनेदरम्यान गावातील शेकडो नागरिकांनी उपस्थिती लावून जोरदार घोषणाबाजी करत मोजणीला विरोध दर्शविला. बराच वेळ अधिकाऱ्यांशी बाचाबाची झाल्यानंतर परिस्थिती लक्षात घेऊन अधिकाऱ्यांना माघारी परतावे लागले.









