♦
गोंदिया | (अनिल मुनीश्वर ):—–
जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमर वराडे यांनी महायुती सरकारमधील लोकप्रतिनिधींवर धान उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. गोंदिया जिल्ह्याची ओळख धान उत्पादक जिल्हा म्हणून असतानाही यंदा शेतकऱ्यांना धान बोनस मिळालेला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. जिल्ह्यात महायुतीचे दोन राज्यसभा खासदार, दोन विधान परिषद सदस्य आणि चार आमदार असूनही धान बोनसच्या प्रश्नावर कोणीही ठोस भूमिका घेत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
अमर वराडे म्हणाले की, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी डीपीडीसी निधी, सिमेंट रस्ते, समाजभवने आणि विविध विकासकामांसाठी सातत्याने प्रयत्न करताना दिसतात. मात्र, ज्या शेतकऱ्यांच्या मतांच्या जोरावर ते निवडून आले, त्या शेतकऱ्यांच्या धान बोनसच्या प्रश्नावर ते शांत का आहेत, असा सवाल आता शेतकरी विचारत आहेत.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी गोंदियातील प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचे सरकार सत्तेत आल्यास धान बोनस वाढवून देण्याची घोषणा केली होती, अशी आठवण करून देत त्या घोषणेची अंमलबजावणी करण्यासाठी महायुतीतील लोकप्रतिनिधींनी राज्य सरकारकडे तातडीने पाठपुरावा करावा, अशी मागणी त्यांनी केली.
वराडे यांनी पुढे आरोप केला की, गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यात हजारो कोटी रुपयांचा विकासनिधी आणण्यात आला असून विविध रस्ते, इमारती आणि इतर विकासकामांवर भर दिला जात आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या हिताच्या धान बोनसच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला. मातोश्री पांधण रस्ते योजनेसह विविध योजनांतील कामांवर लोकप्रतिनिधी सक्रिय दिसतात; परंतु धान बोनससाठी त्याच पातळीवर आवाज उठवताना दिसत नसल्याची टीकाही त्यांनी केली.
जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत धान बोनससाठी शासनाकडे तत्काळ पाठपुरावा करावा, अशी मागणी अमर वराडे यांनी केली.










