सडक अर्जुनी(निखिल मुनीश्वर):————-
कुणबी समाज संघटना, सडक अर्जुनी यांच्या वतीने आयोजित जगद्गुरु संत तुकाराम महाराज जयंती सोहळा व महिला हळदीकुंकू कार्यक्रम आज उत्साहात पार पडला. या कार्यक्रमानिमित्त समाजासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलेल्या कुणबी समाज भवनाचे ३० लक्ष रुपयाचे बांधकाम माजी खासदार मा. सुनीलजी मेंढे यांच्या विकास निधीतून पूर्ण करण्यात आले, सदर समाज भवनाचा लोकार्पण सोहळा सौ. शुभांगी सुनील मेंढे यांच्या हस्ते संपन्न झाला.
कुणबी समाजासाठी स्वतंत्र व सुसज्ज समाज भवन उपलब्ध होणे ही समाजाच्या एकोपा, सांस्कृतिक जतन आणि भावी पिढ्यांच्या सामाजिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची पायरी असल्याचे मत यावेळी सौ. मेंढे यांनी व्यक्त केले. या समाज भवनामुळे विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक उपक्रमांना चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
संत तुकाराम महाराजांचे विचार, सामाजिक समतेचा संदेश आणि महिलांच्या सन्मानाचे महत्त्व अधोरेखित करणारा हा कार्यक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला. अशा उपक्रमांमुळे समाज अधिक संघटित व सक्षम होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास जि.प. अध्यक्ष श्री. लायकरामजी भेंडारकर, सौ. शारदा राजकुमार बडोले, श्री. देवचंदजी तरोने, न.प. उपाध्यक्ष सौ. वंदना डोंगरवार, श्री. अंकित भांडारकर, श्री. राजभाऊ हेडाऊ, सायमा शेख, सौ. कमला अग्रवाल, श्री. मधुसूदन दोनोडे, सौ. शीलाताई भंडारकर, सभापती सौ. मुक्ताबाई हत्तीमारे, सभापती सौ. रजनीताई परिहार, सौ. शशिकला टेंभुर्णी, श्री. रामभाऊ गायधने, श्री. महिंद्र वंजारी, श्री. नारायण भंडारकर, सौ. पुष्पा खोटेल, श्री. विनोद बारसागडे श्री. दिनेश हुकरे, श्री. ललित डोंगरवार, यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल संत गाडगे कुणबी समाज संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्व आयोजकांचे मान्यवरांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.







