गोंदिया(अनिल मुनीश्वर): (१० जानेवारी २०२६)
स्थानिक कृष्णा सहयोगी तंत्र शिक्षण संस्था द्वारा संचालित ”छत्रपती शिवाजी संकुल” येथील छत्रपती शिवाजी संकुल उत्सव समितीच्या वतीने दिनांक १० जानेवारी २०२६ रोज शनिवारला शिक्षणमहर्षी झामसिंगजी येरणे, अध्यक्ष, कृ.स.तं.शि.सं.,देवरी यांचा दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी असलेल्या अमृत महोत्सवी ७५वा वाढदिवसानिमित्त पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी कॉलेज ऑफ फार्मसी च्या कॉन्फ्रेंस रूम मध्ये एम. जी. भुरे, नियोजनप्रमुख, छत्रपती शिवाजी संकुल उत्सव समिती यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सौ.मंजुषा सोनपिपरे, प्राचार्य, सी. एस. आयुर्वेदीक महाविद्यालय व हॉस्पिटल, देवरी, उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, छत्रपती शिवाजी संकुलातील सर्व विभागाचे प्राचार्य व मुख्याध्यापक तसेच पत्रकार व इलेक्ट्रॉनिक मीडिया चे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ही पत्रकार परिषद पार पडली.
या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त दिनांक १२ जानेवारी २०२६ ला सकाळी १०:०० ते सायं. ४:३० पर्यंत सी. एस. आयुर्वेदीक महाविद्यालय व हॉस्पिटल, देवरी येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन होणार आहे. या शिबिरामध्ये सीकल सेल व थॅलेसेमिया या रोगांचे निदान करण्याकरिता मोफत आरोग्य तपासणी व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन होणार आहे तसेच तज्ञ डॉक्टरांकडून आरोग्याविषयीचे योग्य मार्गदर्शन केले जाईल. तसेच दिनांक १३ जानेवारी २०२६ रोज मंगळवारला सकाळी ११:०० वाजता बस स्थानक, देवरी येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पिण्याच्या थंड पाण्याची सोय व्हावी त्याकरिता बस स्थानक, देवरीला वाटर कुलर भेट देण्यात येणार आहे. साहेबांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून दि. १४ ते १७ जानेवारी २०२६ दरम्यान आयपीएलच्या धर्तीवर सी. एस. प्रिमियर लीगच्या दुसऱ्या सीजनचे आयोजन करण्यात येणार आहे. या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये संकुलातील सर्व युनिटमधील कर्मचारी यामध्ये सहभागी होतील. मागील वर्षी झालेल्या यशस्वी आयोजनामुळे यावर्षी सुध्दा संकुलातील शिवनेरी ब्लास्टर्स, रायगड रॉयल्स, राजगड रॉयल्स, पुरंदर नाईट रायडर्स व सिंहगड स्ट्रायकर्स या पाच संघादरम्यान हे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी प्रथमच महीला कर्मचारी सुद्धा या आयोजनात सहभागी होणार आहेत. या पत्रकार परिषदेचे संचालन श्री. आर. एल. मेश्राम सर व उपस्थितांचे आभार श्री. जी. एम. काशिवार सर यांनी केले.
एकंदरीत या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित सर्व कार्यक्रमांमध्ये सर्व पत्रकार बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन छत्रपती शिवाजी संकुल उत्सव समितीच्या वतीने समितीचे नियोजनप्रमुख श्री. एम. जी. भुरे सर व सर्व पदाधिकारी यांनी केले.








