सडकअर्जुनी(निखिल मुनीश्वर):—————
शिवजन्मोत्सव सोहळा समिती, सडक अर्जुनी तसेच सृष्टी, पर्यावरण शिक्षण आणि सर्वांगीण विकास बहुउद्देशीय संस्था सडक अर्जुनी यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त महा रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य तपासणी, सांस्कृतिक कार्यक्रम व शिवव्याख्यान अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रम जि. प. प्राथमिक शाळा समोर, दुर्गा चौक, सडक अर्जुनी येथे शांततामय व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या महा रक्तदान शिबिरास नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. या शिबिरामध्ये २५ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
आरोग्यविषयक उपक्रमांतर्गत मोफत दंत तपासणी शिबिराचा लाभ २२ नागरिकांनी, तर रक्तदाब व रक्तातील साखर तपासणीचा लाभ ४६ नागरिकांनी घेतला. यासोबतच मोफत आरोग्य तपासणी व जनजागृतीपर सेवा देण्यात आल्या.
शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून ६ शाळांमधील सुमारे २०० विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत वेशभुषा स्पर्धा, एकल नृत्य, सामूहिक नृत्य, वक्तृत्व सादरीकरण व विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देण्यात आला. दुपारी बक्षीस वितरण व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अनुषंगाने पर्यावरण व वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण कार्य तसेच निस्वार्थ सेवा करणाऱ्या २७ सर्पमित्रांचा विशेष सत्कार करण्यात आला. सर्पदंश प्रतिबंध, सुरक्षित साप बचाव, नागरिकांमध्ये जनजागृती तसेच मानवी जीवन रक्षणासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना सन्मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.
रात्री आयोजित शिवव्याख्यानात प्रसिद्ध शिवव्याख्याते निखिल दादा बनसोड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर सखोल व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.
या व्याख्यानात त्यांनी शिवाजी महाराजांचे बालपण, स्वराज्य स्थापनेची प्रेरणा, आदर्श प्रशासन, युद्धनीती, सर्वधर्मसमभाव, स्त्री सन्मान तसेच आजच्या पिढीसाठी शिवचरित्राचे महत्त्व प्रभावी शब्दांत मांडले. सदर व्याख्यानातून युवकांमध्ये राष्ट्रभक्ती, कर्तव्यनिष्ठा व समाजप्रती जबाबदारीची भावना वृद्धिंगत झाली असून उपस्थित श्रोत्यांनी व्याख्यानास भरभरून प्रतिसाद दिला.
कार्यक्रमास तालुका वैद्यकीय अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक,
गावातील नगराध्यक्ष, नगरसेवक, व्यापारी वर्ग तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर डॉक्टरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची पाहणी केली व आयोजकांचे अभिनंदन केले.
सदर शिवजन्मोत्सव कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या खालील सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले : अनिकेत कापसे, रोशन गहाणे, चितेश शेंडे, गणेश मालदे, आकिब शेख, नितेश कोरे, उमेश उदापुरे, प्रणय येरणे, रितेश खरोले, विक्रम पुरी, नौशाद अली, विनय राजगिरे, कार्तिक पटले, भेषक यावलकर, भाविक गिऱ्हेपुंजे, दिशांत खरोले, शंकर गुडिमेश्राम, प्रणय यावलकर, मंगल तिवारी. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व स्तरातून शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे कौतुक करण्यात येत आहे.









