सडक अर्जुनी(अनिल मुनीश्वर):————
तालुक्यातील बाम्हणी खडकी येथे झाडीपट्टी पारंपारिक सांस्कृतिक कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात तब्बल ७६ प्रकारचे कार्यक्रम झाले आणि १४३ कलाकारांनी भाग घेतला होता.
या महोत्सवात एक आगळावेगळा प्रकार म्हणजे या आधी कधी ज्यांना मंचावर कुणी पाचारण केले नाही अशा पुरुष व महिलांना कार्यक्रमाचे उद्घाटक , दीप प्रज्वलक , प्रमुख अतिथी आणि विशेष अतिथी म्हणून स्थान देण्यात आला. विशेष म्हणजे या कार्यक्रमात गावातील अकरा व्यक्तींना बाम्हणी गावरत्न पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात थाटामाटात दिमाखदार पद्धतीने बँड वाद्यांच्या गजरात करण्यात आली. प्रमुख आतिथींच्या स्वागत आणि मनोगतानंतर गावातील तिन वार्डातील तीन लेझीम पथक व एक दांडीया पथक यांनी सामुहिक कवायतीचे प्रदर्शन केले. यात गावातील होतकरू महिलांनी सहभाग घेतला होता. हा गाव कलाकारांचा कार्यकम असल्याने यात गावातील कलाकर मंडळींनी भरभरून सहभाग घेतला होता. सामुहिक कवायतीनंतर वेशभुषा कार्यक्रम घेण्यात आला.यात विविध वेशभूषा धारण करित आबालवृद्धांनी सहभाग घेतला. सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरवात सामुदायिक प्रार्थना व ग्रामगीताने करण्यात आली. त्यानंतर विविध पारंपारिक गाणे , पारंपारिक नृत्य आविष्कार , नकलाविष्कार , नाट्यविष्कार,भारूड , अभंग , सोंगिभारड , एकल नाट्य या सारखे कार्यक्रम सादर करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन झाडीबोली साहित्य मंडळ शाखा बाम्हणीच्या वतीने करण्यात आले होते. संपूर्ण कलाकारांना त्यांच्या कला योगदानाबद्दल त्यांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक नरेश भेंडारकर यांनी तर संचालन किशोर तरोणे यांनी केले,आभारप्रदर्शन चंदू सोनुले यांनी केले








