नाशिकमध्ये राहुल गांधींची अमर वराडे कुटुंबीयांशी स्नेहपूर्ण भेट
‘संघटन सृजन अभियान’च्या समारोपात महाराष्ट्रातील ७० नवनियुक्त जिल्हाध्यक्षांशी साधला संवाद
नाशिक(अनिल मुनीश्वर):-
काँग्रेस पक्षाच्या वतीने नाशिक येथील MTDC Grape Park Resort येथे २४ ऑगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या १० दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर **‘संघटन सृजन अभियान’**चा २ सप्टेंबर रोजी समारोप झाला. या समारोप सोहळ्यास लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची विशेष उपस्थिती होती.
या प्रशिक्षण शिबिरात महाराष्ट्रातील विविध जिल्हे व शहरांतून निवडण्यात आलेल्या ७० नवनियुक्त जिल्हा व शहर काँग्रेस अध्यक्षांनी सहभाग घेतला. समारोपप्रसंगी राहुल गांधी यांनी नवनियुक्त अध्यक्षांशी संवाद साधत पक्ष संघटना अधिक बळकट करणे, तळागाळातील पक्षाची सक्रियता वाढविणे तसेच सध्याच्या राजकीय परिस्थितीत कार्यकर्त्यांची भूमिका याबाबत मार्गदर्शन केले.
यादरम्यान गोंदिया जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अमर वराडे यांनी आपल्या कुटुंबीयांसह राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या पत्नी सौ. केशरी वराडे, पुत्र रोनित आणि कन्या अभिरी उपस्थित होते.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांनी वराडे कुटुंबीयांशी अत्यंत आत्मीयतेने आणि सहजपणे संवाद साधला. विशेषतः त्यांनी अमर वराडे यांच्या कन्या अभिरीशीही काही वेळ संवाद साधत विविध विषयांवर चर्चा केली. राहुल गांधी यांचा कुटुंबीयांशी असलेला आपुलकीचा आणि स्नेहपूर्ण व्यवहार उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता.
यावेळी बोलताना अमर वराडे यांनी सांगितले की, देशाचे नेते आणि विशेषतः युवकांचे आशास्थान असलेल्या राहुल गांधी यांची कुटुंबीयांसह भेट घेण्याची व त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळणे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. ही भेट आपल्या जीवनातील एक विशेष आणि अविस्मरणीय क्षण असल्याचे सांगत त्यांनी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व तसेच पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
— AGMNEWS24
मुख्य संपादक : अनिल मुनीश्वर









