भ्रष्टाचाराविरोधात एसीबीची जनजागृती मोहीम
आमगाव, सालेकसा व तिरोडा तालुक्यांत शासकीय कार्यालयांना भेटी; आठवडी बाजारात पत्रकांचे वाटप
गोंदिया(अनिल मुनिश्वर):-दि. २८ ऑक्टोबर
दक्षता जनजागृती सप्ताहाच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गोंदिया यांच्या वतीने बुधवारी (दि. २८ ऑक्टोबर) भ्रष्टाचारविरोधी जनजागृती मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेद्वारे नागरिकांना भ्रष्टाचाराचे दुष्परिणाम, लाच देणे-घेणे हा कायद्याने गुन्हा असल्याची जाणीव करून देत, लाचेची मागणी झाल्यास निर्भयपणे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले.
या मोहिमेदरम्यान आमगाव, सालेकसा व तिरोडा तालुक्यांतील विविध शासकीय कार्यालयांना भेटी देण्यात आल्या. कार्यालयांच्या दर्शनी भागात भ्रष्टाचारविरोधी जनजागृतीपर भित्तिपत्रके लावण्यात आली. तसेच नागरिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया समजावून सांगण्यात आली.
आठवडी बाजारात नागरिकांशी संवाद
रावणवाडी-कामठा येथील आठवडी बाजारातही जनजागृती मोहीम राबविण्यात आली. यावेळी बाजारात उपस्थित नागरिक व व्यापाऱ्यांना भ्रष्टाचारविरोधी जनजागृतीपर पत्रकांचे वाटप करण्यात आले. शासकीय कामासाठी कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी विहित कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी घाबरून न जाता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले.
पारदर्शक प्रशासनासाठी जनसहभागाचे आवाहन
दक्षता जनजागृती सप्ताहाचा प्रमुख उद्देश नागरिकांमध्ये भ्रष्टाचाराविरोधात जागरूकता निर्माण करणे, शासकीय कामकाजात पारदर्शकता व प्रामाणिकपणा वाढविणे आणि भ्रष्टाचारमुक्त समाजनिर्मितीसाठी जनतेचा सक्रिय सहभाग मिळविणे हा आहे. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी नागरिकांनी सजग राहून लाच देणे अथवा घेणे टाळावे आणि लाचेची मागणी झाल्यास संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गोंदिया यांच्यातर्फे करण्यात आले.लाचेची मागणी झाल्यास येथे संपर्क साधा–
टोल फ्री क्रमांक : १०६४
आवाहन : लाच देऊ नका, लाच घेऊ नका!








