देवरी(निखिल मुनीश्वर):-
स्थानिक देवरी येथील कृष्णा सहयोगी तंत्र शिक्षण संस्था देवरी द्वारा संचालित तालुक्यातील अग्रगण्य सी.एस. इंग्लिश पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांनी नेल्टास स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
या स्पर्धा परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवत गुणवत्तेची परंपरा कायम राखली.
नेल्टास द्वारा एस कॅट, ई कॅट आणि एम कॅट अशा स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी बाजी मारली. एम कॅट ही एक आंतरराष्ट्रीय कौशल्य आधारित स्पर्धा आहे जी गणिताच्या दहा मूलभूत कौशल्यांचे मूल्यांकन करून ती वाढवते, जेणेकरून विद्यार्थ्यांचा या विषयात भक्कम पाया तयार होतो. यामध्ये वर्ग आठवीतील विद्यार्थिनी देविका प्रवीण डांगे आणि पूर्वी धर्मराज कटरे यांनी विशेष प्राविण्य प्राप्त करून पारितोषिक मिळवले.
यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये श्रेया वालदे,लक्ष्मी पटले, कनक बाजपाई,जान्हवी कटकवार,कृती शहारे, कुशल गणवीर, वोदान बोरकर यांनी प्राविण्य प्राप्त केले.
विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय विद्यालयातील प्राचार्य अश्मित पिल्लई, समन्वयिका सायमा शेख तसेच गणित विषय शिक्षक कार्तिक कोकावार यांना दिले.
या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक वृंद यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या,तसेच आगामी परीक्षांमध्येही विद्यार्थी असेच उज्वल यश संपादन करतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशामुळे संपूर्ण विद्यालय व पालक वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.










