युवा शक्तीच्या बळावर प्रत्येक बूथ मजबूत होईल, जनतेपर्यंत सरकारच्या योजना पोहोचतील – रोहित अग्रवाल
भाजयुमोच्या विस्तारित बैठकीत संघटन विस्तार, बूथ सशक्तीकरण व नियुक्तीपत्र वितरण
गोंदिया(अनिल मुनीश्वर ):——
भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) गोंदिया जिल्ह्याची विस्तारित बैठक शहरातील अग्रसेन भवन येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीत संघटन विस्तार, प्रत्येक बूथ सशक्त करणे, सदस्य नोंदणी अभियानाला गती देणे, केंद्र व राज्य सरकारच्या जनकल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविणे तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक तयारीचा आढावा घेण्यात आला.
बैठकीला भाजप जिल्हाध्यक्षा सीताताई रहांगडाले, भाजयुमो जिल्हाध्यक्ष रोहित अग्रवाल, महामंत्री पंकज रहांगडाले, नरेंद्र वाजपेयी, हर्षकुमार मोदी, आशीष बारेवार यांच्यासह जिल्हा व मंडळ पदाधिकारी, युवा मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना रोहित अग्रवाल म्हणाले, “युवा शक्ती ही भारतीय जनता पक्षाची सर्वात मोठी ताकद आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या बूथवर सक्रिय राहून संघटना मजबूत करावी. सरकारच्या जनकल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी युवकांनी जनसंपर्क वाढवून सेवा, संघटन आणि राष्ट्रहित या तत्त्वांवर कार्य करावे.”
सीताताई रहांगडाले यांनी सांगितले की, “भारतीय जनता पक्षाची ताकद समर्पित कार्यकर्त्यांमध्ये आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विकासकामांची माहिती घराघरात पोहोचवून जनतेचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सातत्याने काम करावे.”
बैठकीत बूथ व्यवस्थापन, सदस्यत्व विस्तार, सेवा उपक्रम, सोशल मीडिया अभियान, मतदार संपर्क, युवा संमेलन तसेच आगामी निवडणुकांसाठी प्रभावी नियोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रत्येक बूथ मजबूत करण्याचा आणि पक्ष संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
याप्रसंगी युवा मोर्चाच्या जिल्हा व मंडळ पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.
बैठक यशस्वी करण्यासाठी मनोज बोपचे, पुष्पराज जनबंधू, अभय मानकर, इंद्रजीत भाटिया, संतोष कटरे, विक्की बघेले, कमलेश चुटे तसेच सर्व मंडळ अध्यक्ष, युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.









