गोंदिया (अनिल मुनीश्वर):———–
वाळू उपसा व वाहतुकीप्रकरणी कारवाई न करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना वनपालासह तीन वनकर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गोंदिया पथकाने मंगळवारी (दि. ११ ऑगस्ट) रंगेहात पकडले. ही कारवाई अर्जुनी-मोर तालुक्यातील परसटोला येथील राजोली सहवनक्षेत्र वनपरिक्षेत्राच्या कार्यालयात करण्यात आली.
या कारवाईत वनपाल,रमेश सखाराम पचारे (वय ५७), राजोली सहवनक्षेत्र, वनरक्षक निलोत्पल हिरालाल शिकारे (वय ३१), परसटोला वनपरिक्षेत्र आणि वनरक्षक चिंटू मंगलसिंग परिहार (वय ३८), राजोली सहवनक्षेत्र या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
एसीबीकडे प्राप्त तक्रारीनुसार, तक्रारदाराचे घराचे बांधकाम सुरू असून मार्च २०२६ मध्ये घरासाठी लागणारी रेती गावाशेजारील नाल्यातून आणत असताना वनपाल रमेश पचारे यांनी त्याचा ट्रॅक्टर अडवून वाळू उपसा व वाहतुकीबाबत कारवाई करण्याची धमकी दिली होती. कारवाई टाळण्यासाठी २५ हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
त्यानंतर ९ जुलै रोजी तक्रारदार रॉयल्टीची वाळू घराकडे टाकून ट्रॅक्टर घेऊन शेताकडे जात असताना वनपाल पचारे व वनरक्षक शिकारे यांनी ट्रॅक्टर अडवून त्याची चावी काढून घेतली. तसेच घराचे बांधकाम सुरू झाल्यापासून एकही रुपया दिला नसल्याचे सांगून गुन्हा दाखल न करण्यासाठी पुन्हा २५ हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास कारवाई करण्याची धमकी देण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
५ ऑगस्ट रोजी पचारे यांनी तक्रारदारास ८ ऑगस्ट रोजी परसटोला राऊंड ऑफिसमध्ये हजर राहण्याची नोटीस दिली. त्यानुसार तक्रारदार तेथे हजर झाल्यानंतर पचारे व शिकारे यांनी ‘सेटलमेंट’ करण्याचे सांगत २५ हजारांऐवजी २० हजार रुपये देण्याची मागणी केली.
लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने १० ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गोंदिया येथे तक्रार दिली. त्यानंतर एसीबी पथकाने ११ ऑगस्ट रोजी पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी केली. पडताळणीदरम्यान आरोपींनी वाळू उपसा व वाहतुकीबाबत गुन्हा दाखल न करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर एसीबीने सापळा रचला. तक्रारदाराला पंच व व्हॉइस रेकॉर्डरसह लाचेची रक्कम देऊन आरोपींकडे पाठविण्यात आले. यावेळी आरोपी वनपाल रमेश पचारे याने २० हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. त्याचवेळी आरोपी वनरक्षक निलोत्पल शिकारे व वनरक्षक चिंटू परिहार हेही घटनास्थळी उपस्थित असल्याने त्यांनाही ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी केशोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक निलेश लोधी यांच्या पर्यवेक्षणाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक उमाकांत उगले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात पोलीस निरीक्षक अरविंद राऊत, एएसआय करपे, हेड कॉन्स्टेबल बोहरे, कहालकर यांच्यासह पोलीस कर्मचारी सहभागी होते.
कारवाईस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक दिंगबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर आणि अपर पोलीस अधीक्षक विजय माहुलकर यांचे मार्गदर्शन लाभले.
लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार करण्याचे आवाहन
भ्रष्टाचारासंबंधी माहिती किंवा लाच मागणाऱ्या लोकसेवकाविरुद्ध तक्रार असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. गोंदिया एसीबी कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 07182-251203 असून नागरिक 9209041064 या क्रमांकावरही संपर्क साधू शकतात.









