गोंदिया(अनिल मुनीश्वर,ब्युरो चीफ):———–गोंदिया विधानसभा क्षेत्रातील पात्र कुटुंबांना पक्के व सुरक्षित घर उपलब्ध करून देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. घरकुल आवास योजनेअंतर्गत विधानसभा क्षेत्रातील 43,509 लाभार्थ्यांची पात्रता प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पात्रता तसेच आवश्यक मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांना आता नियमानुसार टप्प्याटप्प्याने घरकुल योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
या महत्त्वपूर्ण उपक्रमामध्ये आमदार श्री. विनोदजी अग्रवाल यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांसोबतच सभापती श्री. मुनेशजी रहांगडाले यांचे सहकार्य तसेच पंचायत समिती आणि संबंधित विभागातील सर्व पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या समन्वित प्रयत्नांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे.
ज्या लाभार्थ्यांची पात्रता व आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्यांना शासनाच्या निर्धारित नियमांनुसार व प्रचलित प्रक्रियेनुसार घरकुल बांधकामासाठी निर्धारित निधी टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे पात्र कुटुंबांना स्वतःचे पक्के घर उभारण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे.
यापूर्वीही सुमारे 40 हजार कुटुंबांना मिळाला घरकुल योजनेचा लाभ
गोंदिया विधानसभा क्षेत्रातील नागरिकांची घराची गरज लक्षात घेऊन आमदार विनोद अग्रवाल यांनी मागील काही वर्षांपासून शासन स्तरावर सातत्याने प्रभावी पाठपुरावा केला आहे. या प्रयत्नांच्या माध्यमातून सुमारे 40,000 लाभार्थ्यांना यापूर्वीच घरकुल योजनेचा लाभ मिळाला आहे.
आता नव्याने पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांनाही शासनाच्या नियमानुसार आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
आमदार विनोद अग्रवाल यांनी सांगितले की, गरीब व गरजू कुटुंबांसाठी पक्के घर म्हणजे केवळ एक बांधकाम नसून, ते सन्मान, सुरक्षितता आणि उज्ज्वल भविष्याचा आधार आहे. गोंदिया विधानसभा क्षेत्रातील एकही पात्र कुटुंब आपल्या हक्काच्या निवाऱ्यापासून वंचित राहू नये, यासाठी शासन स्तरावर सातत्याने प्रभावी प्रयत्न केले जातील.
“प्रत्येक पात्र कुटुंबाला त्याच्या हक्काचे पक्के घर मिळावे, हीच आमची प्राथमिकता!”
— आमदार श्री. विनोदजी अग्रवाल
गोंदिया विधानसभा क्षेत्र









