विद्यार्थ्यांच्या हाती शाळेचा कारभार; ‘स्वयंशासन’ उपक्रमातून नेतृत्वाचा धडा
जि. प. वरिष्ठ प्राथमिक शाळा जांभळी दोडके येथे शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम
सडक अर्जुनी(अनिल मुनीश्वर):
शिक्षक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा जांभळी दोडके येथे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, जबाबदारीची जाणीव, आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता विकसित करण्याच्या उद्देशाने ‘स्वयंशासन’ हा अभिनव उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनीच एका दिवसासाठी शिक्षक आणि मुख्याध्यापकाची भूमिका स्वीकारत शाळेचा शैक्षणिक व प्रशासकीय कारभार सांभाळला. कृतिका ओमप्रकाश बोपचे हिने मुख्याध्यापकाची भूमिका पार पाडली. तिने दैनंदिन कामकाजाचे नियोजन, शिक्षकांमधील समन्वय, वर्गव्यवस्था तसेच विविध उपक्रमांचे नियोजन जबाबदारीने केले.
तर चैतन्य बहेकार, साची कांबळे, निधी कांबळे, कल्याणी बावणे, राज्यश्री सोनवाने, नैंसी कांबळे, रुची उईके, नमन बहेकार, अतुल कावळे, लूमेश नेवारे, युग लटये, कुलदीप सोनवाने, अंश पालेवार, खुशबू कावळे, मनाली सिरसाम, इशिता चामलाटे, काव्या उईके, नंदिनी पालेवार, कांचन उईके आणि जानवी रहांगडाले यांनी शिक्षकांच्या भूमिका पार पाडल्या.
विद्यार्थी शिक्षकांनी आपापल्या वर्गांमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने अध्यापन केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधणे, प्रश्नोत्तरे घेणे तसेच वर्गातील शैक्षणिक वातावरण आनंददायी ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षकांचे दैनंदिन काम किती जबाबदारीचे आणि आव्हानात्मक असते, याचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन, वेळेचे नियोजन, नेतृत्व, शिस्त, संवादकौशल्य आणि निर्णयक्षमता यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. पुस्तकातील शिक्षणासोबत प्रत्यक्ष कृतीतून शिकण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
‘विद्यार्थ्यांना केवळ शिकवणे नव्हे, तर त्यांच्यावर जबाबदारी सोपवून त्यांना घडवणे’ हा प्रभावी संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
शाळेचे मुख्याध्यापक किशोर डोंगरवार, शाळा अध्यक्ष राजेशजी सोनवाणे तसेच शिक्षक धम्मदीप साखरे, भुवन बागडे, जितेंद्र कवरे, श्यामा कुंडगीर आणि माया तांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी संपूर्ण दिवसाचे नियोजन व कार्यवाही यशस्वीपणे पार पाडली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हा ‘स्वयंशासन’ उपक्रम प्रेरणादायी ठरला.
AGMNEWS24 | आपली बातमी, आपला विश्वास









