तिरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीकडून नवीन पिकाचे स्वागत
शेतकरी धर्मलाल नथ्थू बोपचे यांच्या ‘1711’ धानाची बाजारात आवक;सुंदर धानाची ३,९९९ रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी
गोंदिया(अनिल मुनीश्वर): —
तिरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन मालाची आवक सुरू झाली असून, नवीन हंगामातील धान घेऊन आलेल्या शेतकऱ्याचे बाजार समितीच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले.
तिरोडा तालुक्यातील मौजा भजेपार येथील शेतकरी धर्मलाल नथ्थू बोपचे यांनी प्रथमच आपल्या शेतातील ‘1711’ नामक नवीन वाणाचे धान विक्रीसाठी तिरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीत आणले. यावेळी बाजार समितीचे सभापती जितेंद्र राहांगडाले यांच्या हस्ते शेतकऱ्याला शाल, श्रीफळ व शेतमाल फवारणी पंप (कीटकनाशक फवारणी पंप) भेट देऊन सत्कार करण्यात आला.
याच कार्यक्रमात आडतिया तेजराम टेंभरे यांच्या माध्यमातून सदर कृषिमालाची विक्री करण्यात आली. उपसभापती भूमेश्वर राहांगडाले यांच्या पुढाकाराने ‘अ’ वर्ग व्यापारी रोहन ट्रेडर्स यांच्या वतीने सर्वोच्च भावात धान खरेदी करण्यात आले. व्यापाऱ्यांचे संचालक भूषण शरैया यांनी शाल, श्रीफळ देऊन शेतकऱ्याचा सत्कार केला.
मार्केट यार्डमध्ये सदर ‘कृषिमाल सुंदर’ नामक धानाची ३,९९९ रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी-विक्री करण्यात आली. विशेष म्हणजे, मागील वर्षीही याच शेतकऱ्याचा कृषीउत्पन्न माल सर्वप्रथम विक्रीसाठी तिरोडा मार्केट यार्डमध्ये आला होता.
या प्रसंगी बाजार समितीचे संचालक घनश्याम पारधी, मिलिंद कुळमेरे, रविंद्रकुमार वहिले, जयप्रकाश गौतम, शरद अग्रवाल, रामसागर धाडवे, रमेश टेंभरे, अनिल भगत, ओमप्रकाश पटले, दुर्गाप्रसाद कोठे, डॉ. गोवर्धन चौहान, मन्दलाल पटले, सौ. प्रतिभा जैतवार, सौ. मनीषा पटले, श्रीमती ललिता नागरीकर, समितीचे प्रभारी सचिव श्री चंद्रकांत चव्हाण तसेच कर्मचारी, आडतिया, व्यापारी, काटेकर, हमाल व स्त्री हमाल आदी उपस्थित होते.
AGMNEWS24 | आपली बातमी, आपला विश्वास









