AGMNEWS24
अवैध वाळू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
८ आरोपींवर गुन्हे दाखल; ७ ब्रास वाळूसह ५ ट्रॅक्टर व १ टिप्पर जप्त — ५० लाख ७२ हजारांचा मुद्देमाल ताब्यात
गोंदिया (अनिल मुनीश्वर):

जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सलग तीन दिवस धडाकेबाज कारवाई केली. या कारवाईत ८ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करून ७ ब्रास वाळू, ५ ट्रॅक्टर व १ टिप्पर असा एकूण ५० लाख ७२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या निर्देशानुसार आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
महालगाव घाटावर दोन ट्रॅक्टर पकडले
१४ सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दवनीवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महालगाव घाट येथील वैनगंगा नदीपात्रातून वाळू काढून अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार महालगाव ते रतनारा मार्गावर नाकाबंदी करण्यात आली.
यावेळी दोन ट्रॅक्टर अडवून तपासणी केली असता त्यामध्ये वाळू आढळून आली. चालकांकडे वाहतुकीचा परवाना नसल्याचे समोर आले. या कारवाईत दोन ट्रॅक्टर-ट्रॉली व २ ब्रास वाळू असा १५ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी राजकुमार नैताम नागपुरे (३०), रा. महालगाव आणि जितेंद्र तिलकचंद ठाकरे (४४), रा. देवरी यांच्याविरुद्ध दवनीवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तेढवा घाटातून ट्रॅक्टर व टिप्पर जप्त
१५ सप्टेंबर रोजी रावणवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तेढवा व डांगुर्ली घाटातून वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तेढवा ते काटी मार्गावर नाकाबंदी करण्यात आली. यावेळी एक ट्रॅक्टर आणि एक टिप्पर अडवून तपासणी केली असता दोन्ही वाहनांमध्ये वाळू आढळली.
या कारवाईत १ ट्रॅक्टर-ट्रॉली व १ ब्रास वाळू तसेच १ टिप्पर व २ ब्रास वाळू, असा एकूण २१ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी खिलेंद्र रामकिशोर म्हात्रे (२९), प्रदीप खुशाल भुरे (२२), राहुल राजू उईके (२५) आणि टिप्पर मालक यश राधेश्याम लिल्हारे यांच्याविरुद्ध रावणवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सालईटोला–चिरचाळी मार्गावर दोन ट्रॅक्टर पकडले
१६ सप्टेंबर रोजी डुग्गीपार पोलीस ठाण्याच्या हद्दीत सालईटोला ते चिरचाळी मार्गावर वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार नाकाबंदी करून दोन ट्रॅक्टर अडविण्यात आले. तपासणीदरम्यान दोन्ही ट्रॅक्टरमध्ये वाळू आढळली. चालकांकडे वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
या कारवाईत दोन ट्रॅक्टर-ट्रॉली व २ ब्रास वाळू असा १२ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आशिष राजकुमार राऊत (२८) आणि मेघनाथ सखाराम उंदीरवाडे (५३), दोघेही रा. डव्वा, ता. सडक अर्जुनी यांच्याविरुद्ध डुग्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई अशाप्रकारे तीन वेगवेगळ्या कारवायांमध्ये ८ आरोपींविरुद्ध कारवाई करून ७ ब्रास वाळू, ५ ट्रॅक्टर व १ टिप्पर असा एकूण ५० लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या निर्देशानुसार पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा संजय चव्हाण, सोमेन्द्रसिंग तूरकर, रियाज शेख, दीक्षितकुमार दमाहे, सुबोध बिसेन, इंद्रजित बिसेन, तुलसीदास लुटे, दुर्गेश तिवारी, पोशि छगन विठ्ठले, सुनील डहाके, निखिल मेश्राम, राकेश इंदूरकर, चापोशी विलेश ठाकरे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली…









