वाळूच्या अवैध वाहतुकीवर एलसीबीची धडक कारवाई
सडक अर्जुनी(अनिल मुनीश्वर):-
दि. २२ : वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया पथकाने धडाकेबाज कारवाई केली आहे. दि. २१ सप्टेंबर रोजी दोन वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी करून ३ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून २ ट्रॅक्टर व २ ब्रास वाळू असा एकूण १५ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक श्री. गोरख भामरे यांच्या निर्देशानुसार व पोलीस निरीक्षक श्री. रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
पहिल्या कारवाईत पोलीस स्टेशन डुग्गीपार हद्दीतील मौजा सालईटोला ते देविटोला रस्त्यावर सापळा लावण्यात आला होता. यावेळी वाळूने भरलेला ट्रॅक्टर आढळला. चौकशीत चालकाकडे कोणताही परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. सदर वाळू उमरझरी नाल्यातून चोरी करून विक्रीसाठी नेत असल्याचे त्याने कबूल केले. यात ७ लाख रुपयांचा ट्रॅक्टर व ६ हजार रुपयांची वाळू असा ७,०६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी उमाकांत मनोहर लंजे (३२, रा. कोहळीटोला, ता. सडक अर्जुनी) याच्याविरुद्ध डुग्गीपार पोलीस स्टेशनात गुन्हा नोंद करण्यात आला.
दुसऱ्या कारवाईत गोंदिया ग्रामीण हद्दीतील मौजा कारंजा ते डव्वा रस्त्यावरील रेल्वे फाटकाजवळ नाकाबंदी दरम्यान ट्रॅक्टर पकडण्यात आला. ही वाळू चोरी करून कारंजा येथील मैदानात लपवून ठेवली होती व विक्रीसाठी नेत असल्याचे समोर आले. यात ८ लाख रुपयांचा ट्रॅक्टर व ६ हजार रुपयांची वाळू असा ८,०६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी चालक जगदीश कोहळे (३८) व मालक दिनेश तांडेकर (३५, दोघे रा. कवलेवाडा, जि. गोंदिया) यांच्याविरुद्ध गोंदिया ग्रामीण पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कामगिरी पोहवा सोमेन्द्रसिंग तूरकर, दीक्षितकुमार दमाहे, भोजराज बहेकार, तुलसीदास लुटे, दुर्गेश तिवारी, पोशि सुनील डहाके, निखिल मेश्राम, राकेश इंदूरकर व चापोशी विलेश ठाकरे यांनी केली.








