सी. एस. इंग्लिश पब्लिक स्कूलमध्ये ‘वृंदावन दरबार’! बालगोपाळांच्या उत्साहात दहीहंडीचा थरार*
*देवरी(राहुल शहारे):-
दि. ३ सप्टेंबर २०२६:* स्थानिक कृष्णा सहयोगी तंत्र शिक्षण संस्था संचलित *सी. एस. इंग्लिश पब्लिक स्कूल, देवरी* मध्ये *’वृंदावन दरबार’* या श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सवाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले. बालगोपाळांचा अभूतपूर्व उत्साह आणि भक्तीच्या रंगात संपूर्ण शाळा न्हाऊन निघाली.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य *अश्मित पिल्लई सर* होते. तर प्रमुख अतिथी म्हणून देवरी नगरपंचायतीचे नगरसेवक *श्री. संजय दरवडे*, संस्थेच्या कोषाध्यक्षा *जयश्रीताई येरणे*, *श्री. योगेश लांडगे, प्राचार्य पलानगाव* आणि समाजसेविका *सौ. अंजली दरवडे* प्रामुख्याने उपस्थित होत्या.
*राधा-कृष्णाच्या रुपाने वेधले लक्ष*
कार्यक्रमाचा प्रारंभ भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन व आरतीने झाला. त्यानंतर इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनींनी गोपींच्या वेशभूषेत श्रीकृष्ण जन्माचे प्रसंगात्मक नृत्य सादर करून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. महिला शिक्षिका आणि माता-पालकांनी गायलेल्या गोड श्रीकृष्ण पाळण्याने संपूर्ण परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला.
नर्सरी ते दुसरीच्या लहानग्यांनी साकारलेली *राधा-कृष्णाची आकर्षक रुपे* आणि त्यांच्या मातांनी साकारलेली ‘यशोदा माता’ उपस्थितांचे विशेष आकर्षण ठरले.
याप्रसंगी आयोजित *’आकर्षक वेशभूषा’* आणि मटकी-बासरी सजावट, मुकुट व बाजूबंद सजावट स्पर्धांमध्ये नर्सरी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी उस्फूर्त सहभाग घेतला. लहानग्यांचे रंगमंचावरील ‘कॅटवॉक’ आणि पालकांसोबतचे सादरीकरण उपस्थितांची दाद मिळवून गेले. विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाच्या जीवनमूल्यांवर अभ्यासपूर्ण मनोगतही व्यक्त केले.
*दहीहंडीचा थरार आणि नारीशक्तीचे दर्शन*
कार्यक्रमाचा मुख्य केंद्रबिंदू ठरला तो म्हणजे *दहीहंडीचा थरार!* बालगोपाळांनी एकमेकांच्या खांद्यावर पाऊल ठेवत मानवी मनोरे रचले आणि क्षणार्धात दहीहंडी फोडून एकच जल्लोष केला. विशेष म्हणजे, विद्यार्थिनींनीही या दहीहंडीत सहभाग घेत *’नारीशक्ती’* चे दर्शन घडवले. या खेळातून एकता, सहकार्य आणि संघभावनेचा संदेश देण्यात आला.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करत विजेत्या बालगोपाळांना व सहभागी पालकांना पारितोषिके देऊन सन्मानित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका *रीना दोनोडे, प्रिया मेश्राम* व विद्यार्थिनी *देवश्री कापगते* यांनी केले, तर आभार विद्यार्थिनी *राजनंदिनी बारसे* हिने मानले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
*AGM News 24, देवरी*









