कोल्हापूर जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षिका म्हणून दीपाली जनबंधू हिची निवड
आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते सत्कार
सडक अर्जुनी(अनिल मुनीश्वर):-
सरळ सेवा भरती प्रक्रियेत पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या शिक्षक भरतीमध्ये सडक अर्जुनी तालुक्यातील कोहमारा येथील दिपाली ज्ञानेश्वर जनबंधू हिची कोल्हापूर जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या शाळेत माध्यमिक शिक्षिका म्हणून निवड झाली आहे. ग्रामीण भागातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत दिपालीने मिळविलेल्या या यशामुळे कोहमारा परिसराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून तिचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
दिपाली जनबंधू हिने मेहनत, सातत्य आणि जिद्दीच्या बळावर शिक्षक पदाचे स्वप्न साकार केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही योग्य मार्गदर्शन, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या जोरावर स्पर्धात्मक परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करू शकतात, हे दिपालीच्या यशातून अधोरेखित झाले आहे.
दिपाली जनबंधू हिची शिक्षकपदी निवड झाल्याबद्दल अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा माजी मंत्री इंजि. राजकुमार बडोले यांच्या जनसंपर्क कार्यालयात तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार बडोले यांच्या हस्ते दिपालीला शाल, पुष्पगुच्छ व बुद्धमूर्ती प्रदान करून तिच्या यशाबद्दल अभिनंदन करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार राजकुमार बडोले यांनी ग्रामीण भागातील युवक-युवतींनी स्पर्धात्मक परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन आपल्या गुणवत्तेच्या बळावर यश संपादन करावे, असे आवाहन केले. दिपालीने मिळविलेले यश हे परिसरातील इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून तिच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
सत्कार समारंभास सडक अर्जुनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका शारदाताई बडोले, जिल्हा परिषद सदस्य कविता रंगारी, कोहमारा येथील सरपंच प्रतिभाताई भेंडारकर, नागपुरे, दिपाली चे आई वडील तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.









