छत्रपती शिवाजी फार्मसी कॉलेजमध्ये ‘युवा सक्षमीकरण व रोजगार कौशल्य’ कार्यशाळा
नंदी फाउंडेशन व महिंद्रा प्राईड क्लासरूमचा संयुक्त उपक्रम; विद्यार्थिनींना मिळाले आत्मविश्वासाचे बळ
देवरी(निखिल मुनीश्वर):
स्थानिक छत्रपती शिवाजी कॉलेज ऑफ फार्मसी, देवरी येथे विद्यार्थिनींच्या व्यावसायिक व वैयक्तिक विकासासाठी ३१ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत सहा दिवसीय ‘युवा सक्षमीकरण व रोजगार कौशल्य’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. नंदी फाउंडेशन आणि महिंद्रा प्राईड क्लासरूम यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगारक्षमता वाढ व युवा उपजीविका कार्यक्रमांतर्गत ही कार्यशाळा घेण्यात आली.
‘सहानुभूतीसह रोजगारक्षमता’ या संकल्पनेवर आधारित प्रशिक्षणात नामवंत मार्गदर्शक व कॉर्पोरेट ट्रेनर मेघना दुबे यांनी विद्यार्थिनींना स्पर्धात्मक युगात आवश्यक असलेल्या विविध कौशल्यांचे सोप्या व रंजक पद्धतीने मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी ‘आत्म-जागरूकता व देहबोली’ या विषयातून आत्मविश्वास वाढविण्यावर भर देण्यात आला. दुसऱ्या दिवशी वक्तृत्वकला आणि व्यासपीठावरील भीती दूर करण्यासाठी प्रात्यक्षिक घेण्यात आले. तिसऱ्या दिवशी ‘आयुष्याचे सात पैलू’ या माध्यमातून संतुलित जीवनाचा संदेश देण्यात आला.
चौथ्या दिवशी कॉर्पोरेट क्षेत्रातील गरजा लक्षात घेऊन शाब्दिक व अशाब्दिक संवाद, प्रभावी बायोडाटा लेखन याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. पाचव्या दिवशी विद्यार्थिनींच्या प्रत्यक्ष तयारीसाठी मॉक इंटरव्ह्यू घेण्यात आला. यासोबतच पैशांचे व्यवस्थापन व व्यावसायिक बैठका याविषयीही मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेच्या अंतिम दिवशी समस्या निवारण व सखोल विचारक्षमता या आधुनिक कौशल्यांचा सराव करून घेत प्रशिक्षणाचा समारोप करण्यात आला.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयाच्या समन्वयक मिस चेतना कापगते यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्री. उपदेश लाडे यांच्या मार्गदर्शनाखाली केले.
नंदी फाउंडेशन आणि महिंद्रा प्राईड क्लासरूमच्या या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये केवळ रोजगार मिळविण्यासाठी आवश्यक कौशल्येच नव्हे, तर समाजात संवेदनशीलता, आत्मविश्वास आणि प्रभावी संवादकौशल्याने वावरण्याचे बळ निर्माण झाले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाबद्दल महाविद्यालय प्रशासन व विद्यार्थिनींनी प्रशिक्षक आणि आयोजकांचे आभार मानले.
AGMNEWS24 | आपली बातमी, आपला विश्वास,मुख्य संपादक-अनिल मुनीश्वर…









