AGMNEWS24 विशेष वृत्त
श्री गुरुदेव आध्यात्मिक व शैक्षणिक अभ्यास दौरा उत्साहात संपन्न
सुमारे ६० विद्यार्थी व पालकांचा सहभाग; सेवाग्राम, पवनार, मोझरी, शेगावसह विविध ऐतिहासिक व आध्यात्मिक स्थळांना भेट
सडक अर्जुनी(अनिल मुनीश्वर):
विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण मिळावे, भारतीय इतिहास व संस्कृतीची ओळख व्हावी तसेच संत-महापुरुषांच्या विचारांची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने आयोजित “श्री गुरुदेव आध्यात्मिक व शैक्षणिक अभ्यास दौरा–२०२६” ५ व ६ सप्टेंबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणात व सुखरूपरीत्या संपन्न झाला. या दोन दिवसीय दौऱ्यात सुमारे ६० विद्यार्थी व पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
सडक अर्जुनी येथून विधिवत वाहनपूजन करून दौऱ्याला सुरुवात करण्यात आली. सहल प्रमुख श्री. समीर कोरे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या दौऱ्यात श्री. योगेश मेंढे, श्री. उमेश उदापुरे तसेच इतर सहकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळत सहकार्य केले.
सेवाग्राम ते पवनारपर्यंत ज्ञानाचा प्रवास
दौऱ्यादरम्यान सर्वप्रथम सेवाग्राम आश्रमाला भेट देण्यात आली. येथे विद्यार्थ्यांना महात्मा गांधीजींच्या जीवनकार्याची व आश्रमाच्या इतिहासाची माहिती देण्यात आली. त्यानंतर नाई तालीम परिसरातील आनंद विद्यानिकेतन शाळेला भेट देऊन शेती, सूतकताई, संगीत, मल्लखांब, बालवाडी आदी अनुभवाधारित शैक्षणिक उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
यानंतर बापू कुटीचे दर्शन घेण्यात आले. पुढे पवनार आश्रमात आचार्य विनोबा भावे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन आश्रमाची माहिती व प्राचीन मूर्तींची पाहणी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी ‘गीताई’ पुस्तकेही घेतली.
मोझरीत प्रार्थना व ध्यानाचा अनुभव
त्यानंतर कौंडण्यपूर येथे माता रुक्मिणीच्या माहेरभूमीतील विविध मंदिरांचे दर्शन घेण्यात आले. त्यानंतर सर्व सहभागी मोझरी येथे दाखल झाले. श्री गुरुदेव सेवाश्रमातील सामुदायिक प्रार्थनेत विद्यार्थी व पालक सहभागी झाले. श्री गुरुदेव आध्यात्मिक गुरुकुल येथे मुक्काम करण्यात आला.
दुसऱ्या दिवशी पहाटे सामुदायिक ध्यानात सहभागी झाल्यानंतर राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी स्थापन केलेल्या श्री गुरुदेव सेवाश्रमाची पाहणी करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या महासमाधीचे दर्शन घेऊन त्यांच्या जीवनकार्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
मोझरीजवळील दास टेकडीला भेट देऊन विविध संत, महापुरुष व देवी-देवतांचे दर्शन घेण्यात आले. येथे विद्यार्थ्यांना सर्वधर्मसमभावाचा संदेश अनुभवता आला. राष्ट्रसंतांच्या जीवनाशी संबंधित वस्तू व छायाचित्रांचीही पाहणी करण्यात आली.
शेगावच्या शिस्तबद्ध व्यवस्थापनाने विद्यार्थी प्रभावित
यानंतर सर्व सहभागी संत श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव येथे पोहोचले. महाप्रसादालयातील उत्कृष्ट शिस्त, स्वच्छता, शांतता आणि व्यवस्थापन पाहून विद्यार्थी व पालक प्रभावित झाले. संत श्री गजानन महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर परतीच्या प्रवासाला सुरुवात करण्यात आली.
परतीच्या मार्गावर वरखेड येथे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचे गुरू समर्थ श्री आडकोजी महाराज यांच्या पवित्र स्थळाचे दर्शन घेण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
ज्ञानासोबत संस्कारांची शिदोरी
या दोन दिवसीय अभ्यास दौऱ्यात विद्यार्थ्यांना शिक्षण, इतिहास, संस्कृती आणि अध्यात्म यांचा त्रिवेणी संगम अनुभवता आला. अनुभवाधारित शिक्षण, शिस्त, स्वावलंबन, समाजसेवा, सामुदायिक प्रार्थना व ध्यान तसेच सर्वधर्मसमभाव यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून समजले.
सहल प्रमुख श्री. समीर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्री. योगेश मेंढे, श्री. उमेश उदापुरे व इतर सहकारी मंडळींच्या मोलाच्या सहकार्यामुळे हा दौरा यशस्वी व सुखरूपरीत्या पार पडला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडण्यासोबतच त्यांच्या मनात संस्कार, शिस्त, राष्ट्रप्रेम आणि भारतीय संस्कृतीबद्दल अभिमान निर्माण झाल्याची भावना सहभागींकडून व्यक्त करण्यात आली.
AGMNEWS24 | सडक अर्जुनी
मुख्य संपादक : अनिल मुनीश्वर
“आपली बातमी, आपला विश्वास…”









