सेवा संकल्प अभियानांतर्गत कोकणा येथे वृक्षलागवड
आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते वृक्षारोपण; गावाच्या विकासासोबत पर्यावरण संवर्धनाचा संदेश
सडक अर्जुनी(अनिल मुनीश्वर):
गावाचा सर्वांगीण विकास साधताना पर्यावरण संवर्धन आणि हरित परिसर निर्मितीलाही तितकेच महत्त्व दिले पाहिजे. विकासाच्या प्रक्रियेत निसर्गाचे संतुलन अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येकाने वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी, असा संदेश देत सेवा संकल्प अभियानांतर्गत कोकणा येथे वृक्षलागवड कार्यक्रम उत्साहात पार पडला.
अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा माजी मंत्री इंजि. राजकुमार बडोले यांच्या हस्ते वृक्षारोपण करून अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी गावालगतच्या परिसरात विविध फळझाडांसह उपयुक्त वृक्षांची लागवड करण्यात आली. गावाचा परिसर अधिक हिरवागार करण्यासोबतच भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ व निरोगी पर्यावरण निर्माण करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
मार्गदर्शन करताना आमदार राजकुमार बडोले म्हणाले की, गावाच्या विकासासोबत पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. केवळ वृक्षलागवड करून थांबणे पुरेसे नसून लावलेल्या प्रत्येक रोपाचे संगोपन, संरक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी सर्वांनी स्वीकारली पाहिजे. वाढते प्रदूषण, बदलते हवामान आणि पर्यावरणीय असमतोलाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करणे ही काळाची गरज आहे.
सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून गावागावांत विकासाभिमुख व समाजहिताचे उपक्रम राबविले जात आहेत. कोकणा येथील वृक्षलागवड उपक्रमामुळे ‘हरित गाव, सुंदर गाव आणि निरोगी गाव’ या संकल्पनेला चालना मिळणार आहे. ग्रामस्थ, महिला बचत गट आणि विविध सामाजिक घटकांनी वृक्षसंवर्धनासाठी पुढाकार घेतल्यास या उपक्रमाला व्यापक स्वरूप मिळेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, जिल्हा परिषद सदस्य कविता रंगारी, निशाताई तोडासे, पंचायत समिती सभापती चेतन वडगाये, पंचायत समिती सदस्य शिवाजी गहाणे, गटविकास अधिकारी आदित्य ठाकरे, सहाय्यक गटविकास अधिकारी खोटेले, विस्तार अधिकारी तथा ग्रामपंचायत प्रशासक शहारे, विस्तार अधिकारी पटले, कृषी विस्तार अधिकारी पटले, खेमराज पाटील भेंडारकर, माजी पंचायत समिती सभापती कविता भेंडारकर, माजी सरपंच अमर रोकडे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक, मान्यवर, ग्रामस्थ आणि महिला बचत गटांच्या सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
वृक्षारोपणामुळे कोकणा परिसरात पर्यावरणपूरक वातावरण निर्मितीस हातभार लागणार असून ग्रामस्थांमध्ये वृक्षसंवर्धनाबाबत जनजागृतीही झाली. ‘विकास हवा, पण निसर्गाच्या किमतीवर नव्हे’ हा संदेश देणारा सेवा संकल्प अभियानातील हा उपक्रम पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरला.









