सहकार क्षेत्राच्या विकासासाठी पक्षभेद बाजूला ठेवून कार्य करणार
खा. राजेंद्र जैन; गोंदिया जिल्हा मजूर सहकारी संस्थांच्या संघाची २३ वी वार्षिक आमसभा उत्साहात
गोंदिया(अनिल मुनीश्वर):
सहकार क्षेत्र हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून, जिल्ह्यातील सहकारी संस्थांना अधिक सक्षम करण्यासाठी पक्षभेद बाजूला ठेवून सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही राज्यसभा खासदार राजेंद्र जैन यांनी दिली.
गोंदिया जिल्हा मजूर सहकारी संस्थांच्या संघ मर्यादित, गोंदिया यांची सन २०२६ ची २३ वी वार्षिक आमसभा अध्यक्ष सचिन मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली खासदार राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी वार्षिक सर्वसाधारण सभेत खासदार राजेंद्र जैन यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना खा. राजेंद्र जैन म्हणाले की, खा. प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सहकारी संस्थांच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. सहकारी संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यास त्याचा थेट फायदा कामगार, शेतकरी आणि सर्वसामान्य घटकांना होणार आहे. त्यामुळे सहकार क्षेत्राशी संबंधित प्रश्न शासनापर्यंत प्रभावीपणे मांडून त्यावर सकारात्मक मार्ग काढण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील सहकार चळवळ अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
आमसभेला अध्यक्ष सचिन मिश्रा, उपाध्यक्ष दीपक कदम, मानद सचिव नहर प्रसाद मस्करे, संचालक अरुणकुमार दुबे, उमाशंकर हारोडे, सुनील पलांदुरकर, सुनील गडपल्लीवार, रतनकुमार गोपलानी, सतीश आकांत, भैय्यालाल चांदेवार, राजकुमार फुंडे, राहुल चंद्रिकापुरे, सचिन बहेकार, देवेंद्रनाथ चौबे, राजू एन. जैन, तसेच कलावती जयस्वाल, सुनीता भेलावे यांच्यासह संघाचे पदाधिकारी, संचालक, सभासद आणि सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.









