सी. एस. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये अभियंता दिनाचा उत्साह
अभिनव तंत्रज्ञान प्रकल्पांनी वेधले लक्ष; राज्यस्तरीय क्विझ व मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
देवरी(निखिल मुनीश्वर):
भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त देवरी येथील सी. एस. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये १५ सप्टेंबर २०२६ रोजी अभियंता दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यांना आणि सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने प्रोजेक्ट कॉम्पिटिशन, राज्यस्तरीय क्विझ स्पर्धा तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रभारी प्राचार्य श्री. मुकेश. एम. तरोणे होते. प्रमुख अतिथी म्हणून अकॅडेमिक इन्चार्ज श्री. आर. एल. मेश्राम, स्थापत्य अभियांत्रिकीचे प्रभारी विभाग प्रमुख श्री. एस. डब्ल्यू. झोडे, संगणक अभियांत्रिकीचे प्रभारी विभाग प्रमुख श्री. आर. एस. नंदनवार आणि अणुविद्युत अभियांत्रिकीचे प्रभारी विभाग प्रमुख श्री. एम. जी. हिरवानी उपस्थित होते.
अभिनव प्रकल्पांनी दाखवली विद्यार्थ्यांची कल्पकता
अभियंता दिनानिमित्त आयोजित प्रोजेक्ट कॉम्पिटिशनमध्ये विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आधारित नवनवीन तंत्रज्ञानाचे मॉडेल्स सादर केले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून साकारलेल्या या प्रकल्पांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. तंत्रज्ञानाचा अभ्यास केवळ पुस्तकी न राहता त्याचा प्रत्यक्ष उपयोग कसा करता येतो, याची झलक या प्रकल्पांमधून पाहायला मिळाली.
राज्यस्तरीय क्विझ स्पर्धेतही विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. प्रश्नमंजुषेदरम्यान विद्यार्थ्यांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून भावी अभियंता म्हणून देशाच्या विकासात योगदान देण्याचा संकल्प व्यक्त केला.
आरोग्य तपासणी शिबिरालाही प्रतिसाद:-
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासोबतच त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी उपस्थित मान्यवरांनी अभियांत्रिकी क्षेत्रातील बदलती आव्हाने, आधुनिक तंत्रज्ञानातील संधी आणि भविष्यातील करिअरच्या विविध शक्यता याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अभियंता दिनाच्या शुभेच्छा देताना विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समाज व देशाच्या विकासासाठी योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन कु. रसिका उके व कु. प्रांजली बावनथडे यांनी केले. कु. अंकिता शेंडे हिने प्रास्ताविक केले, तर कु. आरजू ब्राम्हणकर हिने आभार मानले. विद्यार्थ्यांचा उत्साह, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि तंत्रज्ञानाचा आविष्कार यामुळे कार्यक्रम शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.










