सडक अर्जुनी, ता. 21:
नगर पंचायत सडक अर्जुनीच्या रिक्त जागेसाठी दि. 20 जून रोजी पार पडलेल्या पोटनिवडणुकीचा निकाल रवीवारी तहसील कार्यालयात जाहीर झाला. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार विशाल चंद्रशेखर शहारे यांनी दणदणीत विजय मिळवत राजकीय समीकरणे बदलून टाकली आहेत.
उमेदवार ,पक्ष, मते
विशाल चंद्रशेखर शहारे अपक्ष 123 मते,
अतुल फुले राष्ट्रवादी काँग्रेस 104 मते,
मालती अनिल राजगिरे काँग्रेस 13 मते,
अजय सूर्यवंशी शिवसेना उबाठा 4 मते,
विशाल शहारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अतुल फुले यांचा 19 मतांच्या फरकाने पराभव केला.
निकाल जाहीर होताच विशाल शहारे यांच्या समर्थकांनी गुलाल उधळत जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजीने शहरात रॅली काढण्यात आली. विजयी उमेदवाराला हार घालून मिठाई वाटण्यात आली.”जय श्रीराम”,”सडक अर्जुनीच्या विकासासाठी नवी सुरुवात” अशा घोषणा समर्थकांनी दिल्या.
विजयानंतर बोलताना विशाल शहारे म्हणाले, “हा विजय माझा नसून सडक अर्जुनीच्या जनतेचा आहे. पक्ष-संघटना न पाहता विकासासाठी मतदान करणाऱ्या मतदारांचे मी मनापासून आभार मानतो. नगरपंचायत क्षेत्रातील रस्ते, पाणी, स्वच्छता हे माझे प्राधान्य राहील.”
सडक अर्जुनीत अपक्ष उमेदवाराचा विजय म्हणजे मतदार आता पक्षापेक्षा उमेदवाराच्या कामाला आणि प्रामाणिकपणाला महत्त्व देत आहेत, याचे हे उदाहरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात अपक्षाने बाजी मारल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नगरपंचायत सडक अर्जुनीतील काँग्रेसचे नगरसेवक अनिल राजगिरे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक घेण्यात आली होती. 20 जून रोजी मतदान झाले आणि 21 जून रोजी तहसील कार्यालयात मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात आला.










