सडक अर्जुनी(अनिल मुनीश्वर):————————————————–
तालुक्यातील सौंदड येथील लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्य . व उच्च माध्य.विद्यालयात दिनांक 14 एप्रिल 2026 रोज मंगळवारला लोहिया शिक्षण संस्थेचे संस्थापक संस्थाध्यक्ष जगदीश लोहिया यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली समता सप्ताहच्या अनुषंगाने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
संस्थापक – संस्थाध्यक्ष जगदीश लोहिया यांनी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर तसेच महापुरुषांच्या जीवन कार्यातून प्रेरणा घेऊन समाजातील दुर्बल, वंचित शेतकरी, शेतमजूर यांच्या हितासाठी ग्रामीण भागात लोहिया शिक्षण संस्थेतर्गत विद्यालयाची स्थापना करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी संस्थेअंतर्गत विद्यालयाचे संचालन करीत आहेत. तसेच याद्वारे समाजहितासाठी देखील भरीव कार्य करीत आहेत. याचाच भाग म्हणून 2005 मध्ये भूकंपग्रस्त व त्सुनामी पीडितांसाठी गावातून 21000/- रुपये मदतनिधी गोळा करून मदत करण्यात आली. तसेच वनमहोत्सवानिमित्त वृक्षारोपण, सौंदड येथील रेल्वे परिसर व हिरबाजी परिसर येथे वृक्षारोपण अशी अनेक कार्य त्यांनी केली आहे. आपण जन्म घेतला त्या परिसराचे व मातृभूमीचे आपल्याला देणे लागते या उदात्त हेतूने त्यांचे हे कार्य सदैव सुरू असते.
याचाच भाग म्हणून अनेकदा रक्ताचा तुटवडा होऊन रुग्णांना प्रसंगी जीव गमवावा लागू शकते, त्यामुळे आपल्या वतीने शक्य होईल ती मदत करण्यासाठी त्यांनी विद्यालयाचे प्राचार्य उमा बाच्छल, प्राचार्य गुलाबचंद चिखलोंढे, मुख्याध्यापक मनोज शिंदे तसेच संस्थेतर्गत सर्व विद्यालयाचे कर्मचारी व परिसरातील विविध समाजघटकांना सोबत घेवून दिनांक 14 एप्रिल 2026 ला स.10.30 ते सांय 2.30 वाजेदरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
संस्थापक-संस्थाध्यक्ष जगदीश लोहिया यांनी या रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी गावातील व परिसरातील लोकांनी रक्तदान करून या समाज व देशहिताच्या कार्यात सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.







