पेन्शन बिल मंजुरीसाठी ४ हजारांची लाच घेताना कनिष्ठ सहाय्यक जाळ्यात
गोंदिया पंचायत समितीतील आस्थापना विभागात एसीबीची सापळा कारवाई; आरोपी संदीप सानप ताब्यात
गोंदिया(अनिल मुनीश्वर):
सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेच्या सुधारित पेन्शन बिलाचे काम करून चेक देण्यासाठी ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पंचायत समिती गोंदिया येथील कनिष्ठ सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी, १७ सप्टेंबर रोजी रंगेहात पकडले. संदीप शाहूराव सानप (वय ३१), कनिष्ठ सहाय्यक, आस्थापना विभाग, पंचायत समिती गोंदिया असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
तक्रारदार महिला या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, दवणेवाडा, ता. जि. गोंदिया येथे मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. डिसेंबर २०२० मध्ये त्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना पंचायत समितीच्या शिक्षण विभागामार्फत पेन्शन मिळत होती. मात्र, पेन्शनची रक्कम कमी मिळत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर कपात झालेली रक्कम मिळावी व पेन्शनमध्ये दुरुस्ती करण्यात यावी, यासाठी त्यांनी पंचायत समिती शिक्षण विभागात अर्ज केला होता.
या कामासाठी तक्रारदार पंचायत समिती शिक्षण विभागात गेल्या असता, तेथील लिपिक संदीप सानप यांनी बिल पाच लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगून ते मंजूर करण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. त्यावेळी तक्रारदार यांच्याकडील १ हजार रुपये स्वीकारून उर्वरित ४ हजार रुपये चेक तयार झाल्यानंतर देण्यास सांगण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी १७ सप्टेंबर २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गोंदिया येथे तक्रार दाखल केली. तक्रारीची पंच व व्हॉइस रेकॉर्डरच्या सहाय्याने पडताळणी करण्यात आली. त्यावेळी आरोपीने सुधारित पेन्शन बिलाचे काम करून चेक देण्यासाठी ४ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. तक्रारदार यांना पंचांसह लाचेची रक्कम घेऊन पंचायत समिती गोंदिया येथील आस्थापना विभागात पाठविण्यात आले. यावेळी आरोपी संदीप सानप याने ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबी पथकाने त्याला रंगेहात ताब्यात घेतले.
आरोपी लोकसेवकाविरुद्ध पोलीस स्टेशन गोंदिया शहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, गुन्हा दाखल होताच अटक करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे एसीबीकडून सांगण्यात आले.
सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक अरविंद राऊत यांनी कारवाई केली. पर्यवेक्षक अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक निलेश लोधी यांनी काम पाहिले. पथकात पोलीस निरीक्षक उमाकांत उगले, एएसआय करपे, हेड कॉन्स्टेबल बोहरे, कहालकर, एनपीसी शेंडे, बोपचे, कापसे, काटकर, सोनवणे, एलएनपीसी पटले, डांगे आदींचा सहभाग होता.
कारवाईस लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूरचे पोलीस अधीक्षक दिंगबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर आणि अपर पोलीस अधीक्षक विजय माहुलकर यांचे मार्गदर्शन लाभले.
भ्रष्टाचारासंबंधी माहिती किंवा लाच मागणाऱ्या लोकसेवकाविरुद्ध तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. गोंदिया घटक कार्यालयाचा दूरध्वनी 07182-251203 असून, संपर्क क्रमांक 9209041064 आणि ई-मेल acbgondia@gmail.com असा आहे.
AGMNEWS24 | गोंदिया प्रतिनिधी








