झरपडा येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा
पारंपरिक संस्कृती, शेतकरी बांधवांप्रती कृतज्ञता अन् बालगोपालांचा उत्साह

गोंदिया(अनिल मुनीश्वर):-
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील झरपडा येथे डोंगरवार परिवार व समस्त गावकऱ्यांच्या वतीने हनुमान मंदिर परिसरात तान्हा पोळा उत्सव मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. भाजप राज्य परिषद सदस्य तथा जनता सहकारी बँकेचे संचालक डॉ. गजानन डोंगरवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उत्सवात पारंपरिक संस्कृती, शेतकरी बांधवांप्रती कृतज्ञता आणि बालगोपालांचा उत्साह यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला.
कार्यक्रमाला महाराष्ट्र कृषी पंडित पुरस्कारप्राप्त शेतकरी दादा फुंडे, प्रा. जयंत मस्के, प्रा. दादा मस्के, प्रतिभा फुंडे, कुंदा डोंगरवार, डॉ. मनोज डोंगरवार, शालिक राऊत, उपसरपंच दुर्वास मस्के, संतोष डोंगरवार आदी उपस्थित होते. यावेळी नामदेव परशुरामकर, होमराम ठाकरे, घनश्याम परशुरामकर, यादव मेघ्राम, माणिक पगाडे व जासुंदाबाई मस्के यांची सत्कारमूर्ती म्हणून उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
तान्हा पोळ्यानिमित्त बैलपोळ्यात सहभागी झालेल्या शेतकरी बांधवांना टिफिन डब्यांचे वाटप करण्यात आले. तसेच बालगोपालांचा उत्साह वाढविण्यासाठी उत्कृष्ट नंदी, उत्कृष्ट वेशभूषा, लॉटरी तसेच उत्तेजनार्थ विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
उत्कृष्ट नंदी स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे ३३३३, २२२२ व ११११ रुपये, तर उत्कृष्ट वेशभूषेसाठी ११११, ७७७ व ५५५ रुपये बक्षिसे देण्यात आली. लॉटरी पद्धतीनेही ११११, ७७७ व ५५५ रुपये बक्षिसे देण्यात आली. उत्तेजनार्थ तीन बक्षिसे प्रत्येकी ५०० रुपये देण्यात आली. याशिवाय अण्णाजी डोंगरवार व अविनाश नेवारे यांच्या वतीने विविध बक्षिसे व भेटवस्तूंच्या माध्यमातून बालगोपालांचा उत्साह द्विगुणित करण्यात आला.
यावेळी डॉ. गजानन डोंगरवार यांनी ग्रामीण भागातील पारंपरिक सण-उत्सव हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून आपल्या संस्कृतीशी व शेतीच्या परंपरेशी जोडणारा दुवा असल्याचे सांगितले. तान्हा पोळ्याच्या माध्यमातून लहान मुलांना कृषिप्रधान संस्कृतीची ओळख होते. त्यामुळे अशा पारंपरिक सणांमधून संस्कृती व मूल्ये पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सर्वांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
AGMNEWS24
आपली बातमी आपला विश्वास,
मुख्य संपादक-अनिल मुनीश्वर









