♥देवरी | दि. २१ जून २०२६
देवरी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वरील ग्राम मुरदोली शिवारात रविवारी (दि. २१ जून) सायंकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास एका प्रवासी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. ट्रॅव्हल्सचा टायर अचानक फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन अपघातग्रस्त झाले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठा अनर्थ टळला.
प्राप्त माहितीनुसार, संबंधित प्रवासी ट्रॅव्हल्स रायपूरहून नागपूरच्या दिशेने प्रवास करत होती. वाहनात एकूण २९ प्रवासी प्रवास करत होते. प्रवासादरम्यान मुरदोली शिवाराजवळ ट्रॅव्हल्सचा पुढील टायर अचानक फुटला. त्यामुळे वाहन असंतुलित होऊन रस्त्याच्या कडेला गेले. अपघाताची तीव्रता लक्षात घेता मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती, मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाहन अधिक गंभीर अपघातापासून वाचले.
अपघातात ट्रॅव्हल्स चालक जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णवाहिकेच्या सहाय्याने ग्रामीण रुग्णालय, देवरी येथे दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. वाहनातील सर्व २९ प्रवासी सुरक्षित असून त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही.
घटनेची माहिती मिळताच देवरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासह पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली. अपघात नेमका कशामुळे झाला, वाहनाच्या तांत्रिक बिघाडाची स्थिती काय होती याचा तपास देवरी पोलीस करीत आहेत.
या घटनेमुळे काही काळ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती. मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे वाहतूक लवकरच पूर्ववत करण्यात आली. अपघातात मोठी जीवितहानी टळल्याने प्रवासी व त्यांच्या नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.











